उपासना आणि सेवा
“दिवसेंदिवस आपल्या कृतीतून त्या ईश्वराची सुंदर प्रार्थना करा.”
– अब्दुल-बहा
बहाईं श्रद्धावंतांचा असा विश्वास आहे की मानवजात सध्या एका अनोख्या ऐतिहासिक क्षणी आहे, ज्यामध्ये ती सामूहिक परिपक्वतेच्या उंबरठ्यावर उभी आहे, जेव्हा तिची अत्यावश्यक एकता लक्षात येईल आणि परस्परावलंबी जगाला अनुकूल अशा नवीन संरचनांमध्ये अनुवादित केले जाईल. उपासनेबरोबरच, मानवी जीवनातील सर्व विविध प्रक्रिया कशा समजल्या जातात यावर या श्रद्धेचा परिणाम होतो. मानवजातीच्या एकतेच्या या दृष्टीकोनाने प्रेरित होऊन, बहाई अनुयायी एक नवीन जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतात, जी आध्यात्मिक तसेच भौतिक समृद्धीद्वारे वैशिष्ट्यपूर्ण असेल.
बहाई त्यांच्या वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्नांमध्ये या भावनेला अभिव्यक्ती देणाऱ्या संपूर्ण जनतेच्या भल्यासाठी भक्ती आणि प्रार्थनेच्या भावनेला ठोस कृतींशी जोडण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात, उपासना ही सेवेशी जोडली गेली पाहिजे, कारण समाजाची सेवा ही ईश्वरावरील भक्तीची भावना आणि त्याच्या निर्मितीवर प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे.
संपूर्ण भारतातील समुदायांमध्ये, आणि वस्तुत: संपूर्ण जगभरात, बहाई शिकवणींनी प्रेरित लोकांचे गट भक्ती संमेलनांमध्ये त्यांचे निर्मात्याशी असलेले संबंध सामायिक करण्यासाठी आणि अधिक घट्ट करण्यासाठी, तसेच पवित्र लिखाणातील आत्म्याला प्रवृत्त करणार्या शब्दांच्या परिणामावरील अर्थपूर्ण संभाषणांमध्ये भाग घेण्यासाठी नियमितपणे एकत्र येतात. सामूहिक भक्ती आणि पवित्र लेखनांचा अभ्यास यामुळे या शब्दांचा प्रभाव वाढवणारा परिणाम, संभाषणाच्या स्वरूपात किंवा मुलांच्या नैतिक शिक्षण वर्गातून, युवाकिशोर आध्यात्मिक सशक्तिकरण कार्यक्रमांच्या गटांतून किंवा तरुण आणि प्रौढांसाठीच्या अध्ययन गटांच्या माध्यमातून इतरांसोबत सामायिक करण्याचा प्रयत्न होतो. इतरांना आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी उपासनेच्या आणि सेवेच्या या पद्धतीमध्ये गुंतलेले समुदायाचे सदस्य, त्यांच्या सभोवतालच्या वाढत्या संख्येपर्यंत सृजनशील शब्दांचा प्रभाव वाढवण्यास मदत करत आहेत, तसेच त्यांच्या समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध प्रकल्पांच्या श्रेणीला प्रेरणा देत आहेत.
सामुदायिक जीवनाच्या वरील संदर्भात, जेथे उपासना आणि सेवा एकत्र विणल्या जातात, बहाई उपासना मंदिराची भूमिका उत्तम प्रकारे समजू शकते. एखाद्या मंदिराप्रमाणे, मश्रिकुल-अझकार –ज्याचा अर्थ ‘परमेश्वराच्या स्मरणाचे उदयस्थान’ आहे– एक भौतिक रचना आहे ज्यामध्ये सर्व स्तरातील लोक प्रार्थना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आणि त्यांच्या निर्मात्याशी संवाद साधण्यासाठी एकत्र येतात. तरीही उपासना मंदिराचा प्रभाव उपासकांना या भक्तीच्या भावनेचा सेवेच्या कृतींमध्ये अनुवाद करण्यास मदत करण्यापर्यंत विस्तारित आहे. प्रत्येक बहाई उपासना मंदिर त्याच्या परिसरात स्थापन केलेल्या ‘अवलंबित्व संस्थांद्वारे’ सामाजिक, मानवतावादी, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रयत्नांना समर्थन देत आहेत.
“बहाउल्लाह यांनी उच्चारीत केलेले मूलभूत तत्त्व... धार्मिक सत्य हे निरपेक्ष नसून सापेक्ष आहे, दैवी प्रकटीकरण ही एक सतत आणि प्रगतीशील प्रक्रिया आहे, जगातील सर्व महान धर्म मूळतः दैवी आहेत, त्यांची मूलभूत तत्त्वे पूर्णत: सुसंवादित आहेत, त्यांची ध्येये आणि उद्दिष्टे एकच आहेत, त्यांच्या शिकवणी केवळ एकाच सत्याचे पैलू आहेत…”
- बहाई पवित्र लिखाण
सर्व धर्मांचा पाया समान आहे यावर बहाई अनुयायी विश्वास ठेवतात. मानवतेसाठी सर्व दैवी प्रकटीकरणे एकाच दैवी स्त्रोताकडून आली आहेत आणि ती समान शैक्षणिक उद्देश पूर्ण करतात. प्रत्येक धर्मात त्याच्या विशिष्ट इतिहासाची आणि भौगोलिक परिस्थितीची वेगळी मोहर उमटत असली तरी, सर्व धर्मांची महत्वाची आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण एकच आहे. सर्व धर्म हे मानवी स्वभावातील सुप्त नैतिक आणि आध्यात्मिक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आले आहेत आणि अशा समाजांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने आले आहेत जिथे या क्षमतांची भरभराट होऊ शकते आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रसारित केले जाऊ शकते. बदलत्या ऐतिहासिक गरजा आणि परिस्थितींच्या आधारे वेगवेगळ्या धर्मांच्या सामाजिक शिकवणी, कायदे आणि विधी भिन्न असले तरी, शेवटी ते मानवतेच्या सामूहिक परिपक्वता वाढवण्याच्या समान उद्देशासाठी असलेले दिसतात. धर्मांच्या सारतत्वाच्या एकतेची ही समज एक पाया प्रदान करते ज्यावर सर्व धर्मांचे लोक संस्कृतीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी समान आध्यात्मिक वारशाचा आधार घेण्यास शिकू शकतात.
“एकोप्याचा मंडप उभारण्यात आला आहे; तुम्ही एकमेकास परके समजू नये. तुम्ही एकाच वृक्षाची फळे आणि एकाच शाखेची पाने आहात.”
– बहाउल्लाह
बहाई उपासना मंदिर हे मानवतेच्या एकतेला समर्पित आहे. त्या एकमेव निर्मात्याच्या प्रार्थनेसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे स्वागत करून हे महत्त्वपूर्ण तत्त्व चिन्हाने आणि कृतीने देखील ते प्रदर्शित करते.
आपण एका मानवी कुटुंबाचे सदस्य आहोत ही सत्यता बहाई धर्मश्रद्धेच्या केंद्रस्थानी आहे. मानवजातीच्या एकात्मतेचे तत्व म्हणजे “तो केंद्रबिंदु ज्या भोवती बहाउल्लाह ह्यांच्या सर्व शिकवणी परिभ्रमण करतात.”
बहाई धर्माचे प्रेषित संस्थापक बहाउल्लाह, ह्यांनी मानवतेच्या जगाची मानवी शरीराशी तुलना केली आहे. या जीवामध्ये, लाखो पेशी, स्वरूप आणि कार्यात वैविध्यपूर्ण असूनही, निरोगी प्रणाली राखण्यात त्यांची भूमिका बजावतात. शरीराच्या कार्याचे नियमन करणारे तत्व म्हणजे सहकार्य. त्याचे विविध भाग संसाधनांसाठी स्पर्धा करत नाहीत; त्याऐवजी, प्रत्येक पेशी, तिच्या निर्मितीपासून, देणे आणि प्राप्त करणे या निरंतर प्रक्रियेशी जोडलेली आहे.
मानवतेच्या एकतेचा स्वीकार करणे अत्यावश्यक करते की पूर्वग्रह –मग ते वांशिक, धार्मिक किंवा लिंग संबंधित असोत– पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत.
“संपूर्ण ब्रम्हांडातील प्रत्येक निर्मित गोष्ट त्याच्या ज्ञानाचा मार्ग दाखविणारे द्वार आहे...”
- बहाई पवित्र लिखाण
युगानुयुगे, मानव, सृष्टीचे वैभव, भव्यता आणि सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाला आहे –फुलांच्या पाकळ्यांच्या मांडणीत स्पष्ट असलेल्या उत्कृष्ट परिपूर्णतेपासून ते विश्वातील आकाशगंगांच्या वर्तनात व्याप्त असलेल्या रहस्यमय क्रमापर्यंत, विचार आणि भावनांच्या क्षेत्रापासून ते आत्म्याच्या सूक्ष्म आणि अक्षम्य वास्तवापर्यंत. अस्तित्त्वाच्या जगाच्या प्रचंड परिपूर्णता आणि सौंदर्याप्रत, मानवी हृदय आणि मनाला मिळालेला एकमेव योग्य प्रतिसाद म्हणजे त्याच्या निर्मितीमागे असलेल्या बुद्धिमत्तेची उपासना आणि पूजा करणे. ‘गॉड’, ईश्वर किंवा अल्लाह म्हटल्या गेलेल्या या अस्तित्वाचा आणि वैयक्तिक आत्मा यांच्यातील संबंध हा जगातील सर्व धर्मांचा मूलभूत विषय आहे. या प्रेमळ नातेसंबंधाच्या संदर्भातच महान धर्मांचे संस्थापक आपल्या अनुयायांना प्राण्यांच्या प्रवृत्तींना शिस्त लावण्यासाठी आणि सामंजस्यपूर्ण सामाजिक अस्तित्वासाठी आवश्यक असलेले प्रेम, औदार्य, करुणा आणि न्याय यांसारखे दैवी गुण आणि सद्गुण जोपासण्यासाठी प्रेरित करू शकले. परमात्म्याशी असलेल्या या संबंधाने व्यक्तीला केवळ अर्थ, सुरक्षितता आणि नैतिक अभिमुखता प्रदान केली नाही तर मानवजातीच्या एकतेच्या जाणीवेचा आधार म्हणूनही कार्य केले आहे, कारण लोक एकमेकांना एकाच परमेश्वराची लेकरे म्हणून पाहतात, कारण त्यांच्या सारतत्व स्वरूपात तेच दैवी गुणधर्म आणि गुणांचा समान संच दिसतो.
बहाई पवित्र लिखाण हे स्पष्ट करते की जरी आपल्याला सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत त्याच्या गुणधर्मांची अभिव्यक्ती आढळू शकते तरी परमेश्वराची वास्तविकता कोणत्याही नश्वर मनाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. युगानुयुगे, परमेश्वराने मानवतेला शिक्षित आणि मार्गदर्शन करण्यासाठी, परमेश्वराचे प्रकटीकरण म्हणून ओळखले जाणारे दैवी संदेशवाहक पाठवले आहेत, संस्कृतीच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी संपूर्ण जनतेच्या क्षमता जागृत केल्या आहेत जे ते अवतरण्यापूर्वी कधीही शक्य नव्हते.
“या अस्तित्वाच्या जगामध्ये प्रार्थनेपेक्षा अधिक मधूर काहीच नाही.... सर्वात आशिर्वादित अवस्था, प्रार्थना व आर्जवाची अवस्था आहे.”
- बहाई पवित्र लिखाण
मनुष्य हा आध्यात्मिक प्राणी आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला योग्यरित्या विकसित होण्यासाठी पोषण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक पोषण आणि आरोग्यासाठी नियमित प्रार्थना आवश्यक आहे. प्रार्थना आत्म्यासाठी अन्न आहे जे आपल्या अंतःकरणात परमेश्वराबद्दलचे प्रेम वाढवते आणि आपल्याला त्याच्या जवळ आणते. बहाई पवित्र लिखाणाप्रमाणे, “या अस्तित्वाच्या जगामध्ये प्रार्थनेपेक्षा अधिक मधूर काहीच नाही…. सर्वात आशिर्वादित अवस्था, प्रार्थना व आर्जवाची अवस्था आहे…. ती आध्यात्मिकता निर्माण करते, सजगता व दिव्य भावना अस्तित्वात आणते, नविन पवित्र साम्राज्याचे आकर्षण उत्पन्न करते आणि उच्च बुद्धिमत्तेच्या संवेदनशीलतेस जन्म देते.” प्रार्थनेच्या अवस्थेत जगण्यासाठी केवळ प्रार्थना म्हणतांना पवित्र श्लोक उच्चारणे पुरेसे नाही तर सारा दिवस आपण आपले अंतःकरण परमेश्वराकडे वळवले पाहिजे, हे यातून सूचित होते.
तिच्या सर्वोच्च स्वरूपात, प्रार्थना ही परमेश्वराच्या प्रेमळ स्तुतीची शुद्ध अभिव्यक्ती आहे. “प्रार्थना म्हणतांना, खऱ्या उपासकाने, परमेश्वराकडे आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची मागणी न करता त्यांच्यात फेरबदल करून त्या परमेश्वरी इच्छेला अनुरूप करण्याचा प्रयत्न करावा. अशी मनाची ठेवण असेल तरच आंतरिक शांती आणि समाधान अनुभवता येते, जे केवळ प्रार्थनेची शक्तीच प्रदान करू शकते.” तरीही हे देखील साहजिक आहे की आपण अनेकदा परमेश्वराला मदतीची याचना करतो आणि प्रार्थना करतो. अशा प्रार्थनेनंतर, आपण विचार करतो आणि पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग काय आहे त्याप्रमाणे कृती करतो आणि मग आपल्या प्रयत्नांची पुष्टी झाली की नाही ते पाहतो. आपण परमेश्वराच्या दयेवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि खात्री बाळगली पाहिजे की तो आपल्यासाठी जे चांगले आहे तेच प्रदान करेल.